देऊळगांव राजा : अशरफ पटेल : स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. किरण मोगरकर यांनी उपस्थितांना योग व प्राणायामाचे प्रशिक्षण दिले.
१० व्या आंतरराष्ट्रीय योग्य दिनाचे औचित्य साधून क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, एन. सी. सी. विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपारिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर गोरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात योगाचे जनक महर्षी पतंजली व देऊळगाव राजा नगरीचे आराध्य दैवत श्री बालाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
प्रसन्न वातावरणात योगासने व प्राणायामला सुरुवात करण्यात आली. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने ठरवून दिलेल्या प्रोटोकॉल नुसार योग सत्राची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. डॉ. मोगरकर यांनी सुरुवातीलाच योगाचा इतिहास, योगाचे प्रकार सांगितले तसेच आसने व प्राणायामाचे फायदे विशद केले. योगासनांचे प्रशिक्षण देत असताना त्यांनी आसनाची कृती, फायदे व कोणी हे आसने करू नये याविषयी सविस्तर माहीती देऊन उपस्थितांकडून आसने करून घेतली. यामध्ये उभे राहून करण्याची आसने, खाली बसून करण्याची आसने, पोट जमिनीला लावून करावयाची आसने, पाठ जमिनीला लावून करण्याची आसने अशा एकूण १९ आसने व ६ प्राणायामाचे विधी प्रात्यक्षिकासह करण्यात आले. सत्राच्या शेवटी मान्यवरांसह उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्वतःला निरोगी, शांतीप्रिय व स्नेही माणूस बनविण्याचा संकल्प केला तसेच आपल्या कर्माने मैत्रीपूर्ण वातावरण बनविण्याचाही संकल्प केला. योग सत्राचा शेवट शांती पाठाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा डॉ. गजानन तांबडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. महेंद्र साळवे यांनी केले.