देऊळगाव राजा : अशरफ पटेल : संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्प अंतर्गत बाधित आठ गावांच्या दर्जेदार पुनर्वसनाकरिता पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्या दालनात आमदार डॉ राजेंद्र शिंगणे व पुनर्वशीत गावांचे सरपंच यांची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत प्रकल्प बाधित गावांच्या अपेक्षित पुनर्वसित विकास कामांसाठी ५५.४८ कोटी निधींचा प्रस्ताव सादर करण्यात आला. लवकरच सदर प्रस्तावाला मंजुरात देऊ असे आश्वासन पुनर्वसन मंत्री यांनी दिले आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्प अंतर्गत बाधित झालेल्या अनेक गावांमध्ये पुनर्वसनाची कामे प्रलंबित आहे. सदर आठ गावांचे पुनर्वसन झाले असून नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यात आलेली आहे मात्र पायाभूत सुविधा, सार्वजनिक विकास कामे पूर्ण होऊन दहा ते पंधरा वर्षे उलटली असल्याने नागरी सुविधां अभावी रस्ते नाल्या सह इतर पायाभूत सुविधांची दुरावस्था झाली आहे. पुनर्वसित गावांचा व्याप मोठ्या प्रमाणे वाढला असून गावातील भौतिक सुविधा साठी निधी खर्च करणे ग्रामपंचायतच्या आवक्या बाहेर आहे. दरम्यान खडकपूर्णा कार्यकारी अभियंता यांनी प्रकल्प बाधित सिनगाव जहागीर, मंडपगाव (सरंबा फाटा), मंडपगाव चिचखेड, इसरूळ, खल्याळ गव्हाण, सुलतानपूर, गारगुंडी, चिचखेड या गावातील दर्जेदार पुनर्वसन कामांसाठी ५५ कोटी ४८ लक्ष रुपयांचा प्रस्ताव पुनर्वसन मंत्रालयाकडे सादर केला. पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांची खडकपूर्णा प्रकल्प बाधित गावांच्या दर्जेदार पुनर्वसना संदर्भात सकारात्मक चर्चा झाली.लवकरच पुनर्वसन कामासाठी प्रस्तावित निधीला प्रशासकीय मान्यता देऊ असे आश्वासन पुनर्वसन मंत्री श्री पाटील यांनी दिले.यावेळी पुनर्वसन मंत्री यांच्या दालनात राष्ट्रवादीचे नेते गजानन पवार, सरपंच गजानन काकड,गजानन डोईफोडे, सतीश भुतेकर, विश्वासराव शिंगणे, प्रभाकर दंदाले,भिकनराव भुतेकर, सचिन कदम,रामेश्वर वायाळ, श्यामसुंदर भुतेकर, प्रदीप सोळंकी आदींची उपस्थिती होती.