देऊळगाव राजा : अशरफ पटेल : शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. कधी वीज जाईल आणि कधी येईल याचा भरोसा राहिला नाही. दिवसा व रात्रीही अचानक वीज गायब होण्याच्या प्रकाराने नागरिक त्रस्त झाले आहे. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी दि.३१ मे रोजी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
राष्ट्रवादीने उपकार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शहरात अचानक खंडित होणाऱ्या वीस पुरवठ्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विजेची झालेली दरवाढ आणि वेळेवर विज बिल भरूनही नागरिकांना व व्यापाऱ्यांना योग्य सेवा मिळत नाही. परिणामी इन्वर्टर, जनरेटरचा आधार घ्यावा लागत असल्याने नाहक खर्च वाढत आहे. यावर्षी कडाक्याचा उन्हाळा असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. त्यात अचानक वीज पुरवठा खंडित झाला की लहान मुलांपासून ते वृद्धांचा जीव कासावीस होत आहे. तसेच सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने बाजारपेठेत लगबग आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यापारावरही त्याचा परिणाम होत आहे. शहरात तांत्रिक बिघाडाच्या घटना वारंवार होत असल्याने वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरणचे कर्मचारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये महावितरण विरोधात प्रचंड रोष आहे.त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारावर कायमस्वरूपी तोडगा काढून शहरात वारंवार खंडित होणारा वीस पुरवठा सुरळीत करावा,अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका सचिव जहीर पठाण, शहराध्यक्ष विजय खांडेभराड आजमत खान, शंकर वाघमारे,जना मगर, सचिन कोल्हे, असलम खान, आदींनी केली आहे.