देऊळगाव राजा : अशरफ पटेल : केंद्र सरकारने आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शेत पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार असून शेतकऱ्यांची आर्थिक गणित बिघडणार आहे. त्यामुळे रासायनिक खतांची केलेली दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने दि.४ मे रोजी तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी तहसीलदार यांच्या मार्फत केंद्रीय खते व रासायनिक मंत्री डॉ. मनसूख मांडिया यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, खरिपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी शेतकरी मे महिन्यापासूनच खतांची खरेदी करतात. मात्र रासायनिक खतांच्या अचानक झालेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसणार आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांचे दर वाढ केल्याने उत्पादन खर्चाची जुळवाजुळ कशी करावी या विवचनेत शेतकरी सापडला आहे. परिणामी रासायनिक खताच्या दरवाढीने उत्पादन खर्च दीड पटीने वाढल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. उत्पादन खर्चात वाढ होत असताना मात्र शेतमालाच्या बाजारभावात वाढ होत नाही. यामुळे शेती व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात रासायनिक खताचे दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणार नाही. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे रासायनिक खताच्या प्रति बॅग मागे ३०० ते ४०० रुपये वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणित कोलंमडत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे रासायनिक खतांची केलेली दरवाढ तत्काळ मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका सचिव जहीर पठाण, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, आजमत खान, शंकर वाघमारे, निलेश शिंदे, अजबराव मुंढे, असलम खान, राजू गव्हाणे आदींनी केली आहे.