देऊळगांव राजा : अशरफ पटेल : शेतकरी नेते व बुलढाणा लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना राज्य सरकारने सशस्त्र पोलिस संरक्षण दिले आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘तुपकर यांची शिकार करण्याची’ धमकी दिली होती. त्यावरून तुपकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याची सरकारची खात्री पटल्यानंतर सरकारने जिल्हा पोलिस अधीक्षकांना तुपकर यांना तातडीने संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षाच्या उमेदवारांना जोरदार टक्कर दिली आहे. आणि या निवडणुकीत तुपकर यांच्या बाजूने सर्वाधिक मतदान झाल्याचे गोपनीय रिपोर्ट आहेत. त्यातच निवडणूक काळात बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी फेसबुक लाईव्ह करत ‘रविकांत तुपकर यांची शिकार करू’, अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत तुपकर यांनी पोलिस अधीक्षकांना पत्र दिले होते. त्यावरून तुपकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल पोलिसांच्या गोपनीय शाखेने पोलिस अधीक्षकांमार्फत गृहमंत्रालयाला पाठवला होता. या अहवालाची व तुपकरांच्या पत्राची दखल घेऊन गृहमंत्रालयाने तुपकर व कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश दिले होते. काल याबाबत आदेश प्राप्त होताच, आज एक सशस्त्र पोलिस कर्मचारी आजपासून तुपकरांच्या संरक्षणात देण्यात आलेला आहे.