देऊळगांव राजा : अशरफ पटेल : संसदीय निवडणुकांसाठी, भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंग असलेल्या मतदारांना घरून मतदान करण्याची संधी दिली आहे. यंदा प्रथमच ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली जाणार आहे. ज्या व्यक्तींचे वय ८५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त आहे आणि जे दिव्यांग आहेत, त्यांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा फॉर्म १२ डी भरून जमा केला आहे. त्यानंतर मतदानाच्या दिवशी अधिकारी स्वतः तुमच्या घरी येतील आणि बॅलेट पेपरवर तुमचं मत घेतील. ही सुविधा फक्त मतदान केंद्रांवर येऊ न शकणाऱ्या मतदारांसाठी असणार आहे.
मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ०५ बुलढाणा लोकसभा मतदारसंघातर्गत २४ सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील ८५ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाचे मतदार आणि दिव्यांग मतदारांचे मतदान त्यांचे निवासस्थानी जाऊन घेण्यात येत आहे. मा. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि सूक्ष्म निरीक्षक यांचे एक पथक तयार करण्यात आले असून त्यांना दि. १७ एप्रिल रोजी प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले आहे. हे पथक दिनांक २१, २२, २३ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेत आहेत.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ८५ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक मतदारांची संख्या ५३९ आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या २०१ असून महिला मतदारांची संख्या ३३८ आहे. तसेच दिव्यांग (PWD) मतदारांची एकूण संख्या ८९ आहे, यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६३ असून महिला मतदारांची संख्या २७ आहे. दिव्यांग मतदार आणि ८५ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक मतदारांची एकूण संख्या ६२८ एवढी आहे.
या ६२८ मतदारांचे मतदान दि. २१, २२ आणि २३ एप्रिल रोजी नेमून दिलेल्या पथकातील संबंधित अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल आणि व्हिडिओ ग्राफर यांना सोबत घेऊन आजपासून मतदारांच्या निवासस्थानी जाऊन मतदान करून घेत आहेत. मा. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ‘वोट फ्रॉम होम ‘ अंतर्गत आज सुरुवात झाली त्याप्रसंगी मा. तहसीलदार सिंदखेडराजा श्री. प्रवीण धानोरकर, मा. मुख्याधिकारी देऊळगावराजा श्री. अरुण मोकळ, आजच्या मतदान पथकाचे अधिकारी श्री. आर. पी. ठाकरे, श्री. समाधान वाघ,श्री. बी. वाय. म्हस्के, श्री. बी. जे. हंदाळ, श्री. गौरव शेलकर, मा. उपअधीक्षक भूमि अभिलेख देऊळगाव राजा श्री. विजय माईनकर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रसार आणी प्रचार माध्यम सेल मध्ये अंकुश म्हस्के, उमेश गरकळ, प्रकाश शिंदे, संजय सोनुने, राजेंद्र खरात हे काम करत आहेत.