देऊळगांव राजा : अशरफ पटेल : मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दि. १६ मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दि. १५ आणि १६ एप्रिल रोजी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण सहकार विद्या मंदिर सिंदखेड राजा येथे यशस्वीरित्या पार पडले. आजच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रशिक्षणाची सुरुवात मतदारांच्या पसंतीस उतरलेले उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि सौ. नीता संजय खडसे यांनी मतदारांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून स्वतःच्या आवाजामध्ये गायलेल्या गीतापासून करण्यात आली, या संपूर्ण गाण्याची संकल्पना प्रा. खडसे यांची आहे.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये जमलेल्या सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच मागील प्रशिक्षणाची उजळणी करून घेतली. प्रशिक्षण दरम्यान भारत निवडणूक आयोग यांची कायदे,तरतुदी आणि अद्ययावत सूचना यांची माहिती सांगण्यात आली. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट कार्यप्रणाली यांच्या बद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली, टपाली मतपत्रिका व निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र अर्ज व नमुने यांचा अहवाल भरणे बाबत माहिती सांगण्यात आली. मतदान संकलन केंद्रावर ईव्हीएम तसेच मतदान साहित्य ताब्यात घेणे, सूचीनुसार साहित्य तपासणी करणे, ईव्हीएम तपासणी करणे, टपाली मतपत्रिका घेतली असेल तर स्वतःचे मतदान करून घेणे याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली.
मतदानापूर्वी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याबद्दल सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.खडसे यांनी सांगितले कि, मतदान केंद्र उभारणी करणे,अभीरूप (मॉकपोल) मतदान घेणे, कंट्रोल युनिट मधून अभिरुप मतदान नष्ट करणे, VVPAT मधील अभिरूप मतदान चिट्ठया सील करणे याबद्दलची दक्षता घेतली पाहिजे यावर भर दिला. मतदानादरम्यान मतांच्या गोपनियते बाबत माहिती देणे, मतदान सुरू केल्याची घोषणा करणे, मतदान केंद्राध्यक्ष यांनी दैनंदिनी मध्ये घटनांची नोंद घेणे, निवडणूक निर्णय अधिकारी यांना मतदान स्थिती आकडेवारी कळविणे इत्यादी गोष्टी मतदानादरम्यान करायला पाहिजे याबद्दल प्रा.खडसे यांनी मुद्देसूद माहिती दिली. या दोन दिवसाच्या प्रशिक्षणा दरम्यान मतदान अधिकारी, झोनल अधिकारी, मास्टर ट्रेनर यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे , सोबत निवडणूक साहित्य स्वीकृती व तपासणी बाबत मार्गदर्शन सूचना करण्यात आले, मतदानाच्या एक दिवस अगोदरची मतदान केंद्रावरील पूर्वतयारी कशाप्रकारे असायला हवी याबद्दल काही सूचना मा. खडसे यांनी दिल्या आहेत. प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वीची कामे कशाप्रकारे पार पडली पाहिजे आणि त्याची दक्षता कशी घेतली पाहिजे याबद्दल प्रा. खडसे यांनी काही महत्त्वाच्या गोष्टीं सांगितल्या, प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करताना मतदान अधिकारी यांनी त्यांची कामे कशाप्रकारे पार पडली पाहिजेत तसेच मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्त्वाच्या प्रसंगी करावयाचे कार्यवाही याबद्दल त्यांना माहिती सांगण्यात आली.
“चला जाऊ मतदानाला” या आशयाचे फलक सर्व प्रशिक्षणार्थीना देण्यात आले आणि सर्वांना मतदान करावे असे आवाहन मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले. या दोन दिवसाच्या प्रशिक्षणासाठी मा. तहसीलदार सिंदखेड राजा श्री. प्रवीण धानोरकर, तहसीलदार देऊळगाव राजा श्रीमती वैशाली डोंगरजाळ , नायब तहसीलदार सिंदखेडराजा मनोज सातव, नायब तहसीलदार देऊळगाव राजा श्रीमती अस्मा मुजावर, प्र. नायब तहसीलदार नितीन बढे, नायब तहसीलदार श्रीमती प्रांजल पवार, मुख्याधिकारी देऊळगावराजा अरुण मोकळ, प्रसार माध्यम मधील अंकुश म्हस्के, उमेश गरकळ, प्रकाश शिंदे, संजय सोनुने तसेच इतर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.