व्हाईस ऑफ मिडियाच्या शिष्टमंडळाला आ.डॉ.शिंगणेंनी दिला शब्द
देऊळगाव राजा : अशरफ पटेल : पत्रकार भवनाच्या निर्मितीसाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा राज्याचे माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे. या संदर्भात व्हॉइस ऑफ मिडियाच्या शिष्टमंडळाने आ.डॉ. शिंगणे यांची सोमवारी भेट घेतली. देऊळगाव राजा येथील पत्रकारांची पत्रकार भवनाच्या जागेसाठी अनेक दिवसांची मागणी होती. त्यामध्ये नुकतीच दोन गुंठे जागा पत्रकार भवनांच्या कामासाठी देण्यात आली आहे. त्याच्या निर्मिती संदर्भात व्हॉईस ऑफ मिडिया तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुनकुमार आंधळे जिल्हा उपाध्यक्ष मुशीरखान कोटकर सुनील मतकर व पदाधिकाऱ्यांनी आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन पत्रकार भवनासाठी निधीची मागणी केली, यासंदर्भात त्याच ठिकाणी आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्याशी चर्चा केली. यावेळी देऊळगाव राजा शहर व तालुक्यातील पत्रकारांची पत्रकार भवनांची मागणी ही रास्त आहे. त्या भवनांमध्ये फक्त पत्रकार भवनच नाही तर एक सुसज्ज लायब्ररी सुद्धा असली पाहिजे, असे नमूद करून जिल्हास्तर नगरोत्थान योजनेमधून दोन मजली पत्रकार भवनांसाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून देतो असा शब्द आ. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिला. तसेच मुख्याधिकारी अरुण मोकळ यांना तातडीने सदर प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात निर्देशित केले आहे. याप्रसंगी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे व्हॉईस ऑफ मिडियाच्या शिष्टमंडळाने स्वागत केले. यावेळी तालुका अध्यक्ष अर्जुनकुमार आंधळे, जिल्हा उपाध्यक्ष मुशीरखान कोटकर, सुनील मतकर, गजानन घुगे, प्रदिप हिवाळे, सुषमा राऊत, सन्मती जैन, अशराफ पटेल, प्रशांत पंडित, विलास जगताप, खंडू मांटे, विठ्ठल पन्नासे, अमोल बोबडे, शब्बीर खान, देवानंद झोटे, गजानन भालेकर, रामू ढाकणे, शेख समीर उपस्थित होते.