देऊळगांव राजा : प्रतिनिधी : तालुक्यातील देऊळगांव मही येथील पाणी प्रश्न कायमचा मिटावा व नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी वेळेवर मिळावे यासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांची जलजिवन मिशन योजना मंजूर केली आहे. परंतु ठेकेदाराच्या दंडलशाही कारभारामुळे मागील दोन वर्षांपासून जलजिवन मिशन योजनेचे काम संथ गतीने सुरु असून त्यावरही कळस म्हणजे सदर काम हे निकृष्ट दर्जाचे केल्या जात आहे. यामुळे दिवसेंदिवस शहरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. शहरात ठिकठिकाणी पाईप लाईनसाठी खोदकाम केल्यामुळे नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा कसा करावा..? असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनापुढे उभा राहिला आहे.सदर जलजिवन मिशन योजनेचे काम दर्जेदार व वेळेच्या आत पूर्ण करावे अन्यथा जनआंदोलन उभारू असा ईशारा दि.२१ मे रोजी देऊळगांव मही ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी पाणी पुरवठा विभाग- चिखली यांना निवेदना द्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की,मंजुर करण्यात आलेल्या जलजिवन मिशन योजनेच्या कामाला सुरुवात करतांना ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेताच कामाला सुरुवात केली.कंत्राटदारकडून करण्यात आलेल्या या कामात अंदाजे पत्रकाला खो देण्यात आला असून सुरु असलेले काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. या कामासाठी आवश्यकता नसतांना देखील ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहे अद्यापही खोदलेल्या रस्त्याचे काँग्रटीकरण करण्यात आलेले नाही. नव्याने टाकत असलेल्या पाईप लाईन ही जुन्या पाईप लाईनला जोडल्या नसल्यामुळे नागरिकांना दोन महिन्यापासून पाणी प्रश्न भेडसावत आहे. वारंवार होत असलेल्या त्रासाबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाकडून कंत्राटदाराला संपर्क केल्यास उद्धटपणे उडवाउडवीचे उत्तर दिल्या जात आहे. माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातुन देऊळगांव मही शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी शासन दरबारी पाठ पुरावा करून जलजिवन मिशन योजना मंजूर केली आहे. जलजिवन मिशन योजनेचे काम दर्जेदार व वेळेच्या आत पूर्ण करावे अन्यथा दि.२७ मे रोजी जणआंदोलन उभारू असा ईशारा सरपंच प्रतिनिधी उमेश शिंगणे,धर्मराज खिल्लारे, संदीप राऊत, अंनता इंगळे, संजय खरात यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासनाने दिला आहे. उपरोक्त योजनेचे काम आता किती गतीने होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.