देऊळगांव राजा : अशरफ पटेल : प्रत्येकान स्वत्वाचा शोध घेणे गरजेचे आहे, ज्याने स्वतःचा शोध घेतला तोच खरा गुणवंत, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक श्रीकांत साहेबराव देशमुख यांनी केले. श्री व्यंकटेश महाविद्यालयात आयोजित गुणवंतांच्या सत्कार समारोहप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे हे उपस्थित होते.
देऊळगाव राजा नगरीचे आराध्य दैवत श्री बालाजी महाराज तसेच जयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना श्रीकांत देशमुख यांनी आपल्याला समाजामध्ये काही सकारात्मक बदल घडवायचा असेल तर त्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे. मोबाईल ने अनेक खेळ तसेच माणसाचे विचार स्वातंत्र्य गिळंकृत केलेले आहे त्यामुळे आपण मोबाईल पासून दूर राहावे असे आवाहन केले. राजे विजयसिंह जाधव यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना श्री बालाजी संस्थान तसेच श्री व्यंकटेश महाविद्यालय यांच्याकडून गुणवंतांचा जो सत्कार केला जातो, त्या माध्यमातून महाविद्यालय आपणाकडून काही अपेक्षा करीत असते. आपण आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा वापर समाज घडविण्यासाठी, राष्ट्र उभारणीसाठी करावा, असे मत मांडले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गोरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमामध्ये संशोधन मार्गदर्शक, पीएच. डी. धारक प्राध्यापक, पेटंट धारक प्राध्यापक यांच्यासह विद्यापीठ परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा, सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांचा व उत्कृष्ट वाचक विद्यार्थी तसेच गुणवंत खेळाडूंचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्या माजी विद्यार्थ्यांनी सेट, नेट, पीएच. डी. अशी उच्च पदवी प्राप्त केली. विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयाचे नेतृत्व केले. शिक्षक किंवा इतर नोकरीच्या निमित्ताने व व्यावसायिक म्हणून नावारूपास येऊन महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला, अशा गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती ढोकले यांनी केले. प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख डॉ. नरेंद्र शेगोकार यांनी केले. अतिथी परिचय प्रा. मधुकर जाधव यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार प्रा. सौ. मंजुषा मुळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.