देऊळगाव राजा : अशरफ पटेल : जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय बुलढाणा व त्यांचे अधिनस्त असलेल्या कार्यालया मधील विविध उपकरणे, व साहित्य खरेदी प्रक्रियेतील आर्थिक अनियमित्ता केल्याचे साविस्तर तक्रार चंद्रकांत खरात सामाजिक कार्यकर्ते यांनी केलेल्या तक्रारी नंतर निष्पन्न झाल्याने विशेष लेखापरीक्षणा कऱण्यात आले होते. गंभीर मुद्द्यांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव चंद्रकांत वडे यांनी नुकतेच एका पत्राद्वारे चौकशीचे आदेश दिले आहे. दरम्यान विविध विभागातील पाच प्रमुख अधिकारी यांची समिती गठित करण्यात आली आहे, सदर समिती जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा मध्ये खरेदीतील अनियमितता संदर्भात चौकशी करून शासनाकडे ३० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश अवर सचिव यांनी दिले आहे.
महाराष्ट्र शासन युवा सामाजिक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फत त्यांच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध उपकरणे व साहित्य खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमित्ता झाल्याबद्दल तक्रार नोंदविली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने श्री खरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या कार्यालयाचे लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त अधिनियम १९७३ चे कलम (१२) ३ मधील तरतुदीनुसार प्रस्तुत चौकशी ही विशेष तपास समितीकडून करण्याचे निर्देश पोलीस महासंचालक मुंबई यांना देण्यात यावे अशी आग्रही मागणीही चंद्रकांत खरात यांनी लोक आयुक्त प्रशासन भवन मंत्रालय मुंबई यांच्याकडे १२ जानेवरी २०२४ रोजी एका पत्राद्वारे केली होती. सदर तक्रारीनंतर उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ यांनी २९ फेब्रुवारी २०२४ रोजी एका पत्राद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा यांच्याकडून परिपूर्ण परिच्छेद अनुपालन दिलेले नसल्यामुळे संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्या बाबतचे आदेश जारी केले होते. नुकतेच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव चंद्रकांत वडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे रुग्णालयातील उपकरणे व इतर साहित्य खरेदीत झालेल्या अनियमितते बाबत चौकशी करण्यासाठी पाच सदस्य समिती गठित केली. यामध्ये शहरी आरोग्य उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई चे डॉ संजीवकुमार जाधव यांची समिती अध्यक्ष म्हणुन नियुक्ती केली. तर इतर सदस्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर चे कार्यकारी अभियंता, उपसंचालक आरोग्य सेवा अकोला चे अभियंता, प्रशासकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय पालघरचे भाऊ सिन्नलकर,व नितीन काकडे लेखाधिकारी व भांडार पडताळणी अधिकारी कुटुंब कल्याण पुणे यांचा सदर चौकशी समितीत मध्ये समावेश आहे. राज्याचे अवर सचिव यांनी दिलेल्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या पाच सदस्य समितीला सदर प्रकरणात सखोल चौकशी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल कोणत्याही परिस्थितीत ३० दिवसाच्या आत शासनास तसेच आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना सादर करावयाचे आहे. याबरोबरच आयुक्त आरोग्यसेवा आयुक्तालयाने चौकशी समितीच्या चौकशी अहवालाच्या आधारे सदरहू गंभीर आर्थिक अनियमितेस जबाबदार असलेल्या संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय बुलढाणा व मुख्य प्रशासकीय अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध तात्काळ महाराष्ट्र नागरी सेवा १९७१ मधील नियम १२ नुसार विभागीय चौकशीचा प्रस्ताव पुढील १५ दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा मध्ये तांत्रिक उपकरणे व इतर साहित्य खरेदी प्रकरणात झालेल्या गैरव्यवहाराबद्दल सातत्यपूर्ण प्रभावी मुद्देसूद तक्रारी व पाठपुरावा केल्याची राज्य शासनाच्या अवर सचिवाने गांभीर्याने दखल घेतली आहे. शासनाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हा शल्य चिकित्सक व मुख्य प्रशासकिय अधिकारी तसेच ईतर कर्मचाऱ्यावर होणाऱ्या कारवाईकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.