देऊळगाव राजा : अशरफ पटेल : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्याकडून खाते व बियाणे घेण्यासाठी लगबग सुरु आहे. मात्र कृषी केंद्र दुकानदारांकडून जादा दराने बियाणे विक्री केल्या जात असल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गाकडून होत आहे. जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कृषी विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दि.७ जून रोजी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना कृषी केंद्र चालकांकडून जादा दराने बियाणे विक्री होत असल्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेतली. दरम्यान देऊळगाव राजा तालुक्यामधील अनेक कृषी केंद्र जादा दराने बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची लूट करत असून अशा कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादीने कृषी अधिकाऱ्यांकडे केली. देऊळगाव राजा तालुक्यात शेतकऱ्यांकडून शेतीसाठी लागणाऱ्या बियाणांची खरेदी सुरू आहे. सर्व कंपन्यांचे कापूस बियाण्यांच्या पाकिटाची किंमत ८६४ रुपये एवढी ठरलेली आहे. मात्र असे असताना काही कृषी केंद्र चालक हे शेतकऱ्यांना वाढीव दराने कपाशीचे बियाणे विक्री करत आहे. शिवाय लिंकिंग बियाणे घेण्यासाठी अडवणूक करत आहे. तर अनेक शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याचा प्रकार देखील पुढे येत आहे. अशावेळी कृषी विभागाने सतर्क राहून वाढीव दराने बियाणे विक्रीवर तात्काळ अंकुश लावणे गरजेचे आहे. तसेच कृषी केंद्राचे साठा रजिस्टर अद्यावत आहेत की नाही हे देखील तपासणे गरजेचे असून कीटकनाशके कायद्यातील तरतुदीनुसार ज्यादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका सचिव जहीर पठाण, उपाध्यक्ष रावसाहेब गाडवे,शहराध्यक्ष विजय खांडेभराड,आजमत खान,शंकर वाघमारे, जना मगर,असलम खान, राजू गव्हाणे आदींनी कृषी विभागाकडे केली आहे.