पिस फाउंडेशनचे अध्यक्ष आर्किटेक अर्शद शेख यांची खंत
आमेना अजीज उर्दू हायस्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार
देऊळगाव राजा : अशरफ पटेल : देशाच्या प्रगती विषयी आपण भारतीय अद्यापही जबाबदारीने वागत नाही, म्हणून आपण साक्षर झालो मात्र शिक्षित झालो नाही अशी खंत पिस फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष आर्किटेक हर्षद शेख यांनी आमेना अजीज उर्दू हायस्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या दि.१५ जुलै रोजी सत्कार समारंभात व्यक्त केली.
येथील आमेना अजीज उर्दू हायस्कूल येथे शालेय व्यायाम शाळे चे लोकार्पण माजी मंत्री आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालिकेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून आर्किटेक हर्षद शेख अहमदनगर व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दादासाहेब मुसदवाले होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.रामप्रसाद शेळके, संस्थेचे सचिव हाजी आलम कोटकर, जि.प चे माजी विरोधी पक्षनेते मनोज कायंदे, माजी नगराध्यक्ष कवीश जिंतूरकर, गोविंद झोरे, पिस फाउंडेशनचे मिर्झा अफसर बेग, संस्था उपाध्यक्ष हाजी इनायात कोटकर, शिवसेना शहर प्रमुख गोपाळ व्यास, नंदन खेडेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजू शिरसाठ, शरदचंद्र पवार गटाचे राजेश इंगळे, न.प कर अधीक्षक मेहमूद शाह,नगरसेवक प्रदीप वाघ, इस्माईल बागवान, हनिफ शाह, हाजी शफी शाह, ब्रिजमोहन मल्लावत, भाजप शहर उपाध्यक्ष आदर्श गुप्ता, राष्ट्रवादी सरकार अध्यक्ष शेख कदीर, रफिक भाई, आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना अर्शद शेख म्हणाले शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच जबाबदार नागरिक घडवावे,एक जबाबदार आणि शिक्षित विद्यार्थीच देशाच्या प्रगतीत आपला सर्वस्व अर्पण करू शकतो. यावेळी गटशिक्षणाधिकारी मुसदवाले म्हणाले जो विद्यार्थी आतून पेटलेला असतो तोच यशस्वी होतो, सूर्य स्वयंउर्जित असतो त्याला दुसऱ्याकडून प्रकाश घेण्याची गरज नसते. म्हणून विद्यार्थ्यांनो आपला बहुतांश वेळ ग्रंथालयात घालवा, मोबाईल मधील डेटा शी नव्हे तर ग्रंथालयाशी प्रेम करा. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी शाळेच्या शैक्षणिक व भौतिक प्रगती विषयी समाधान व्यक्त करीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मोकळ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्ताफ कोटकर यांनी तर प्राचार्य शारीक नयाब यांनी सूत्रसंचालन केले.